लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील वाकडी शेत शिवारात एकमेकांच्या शेती क्षेत्राला लागून असलेल्या तब्बल १९ शेतक-यांच्या ५२ एकरांवरील उसाला दि. १२ ऑक्टोबर रोजी शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतक-यांचे तब्बल ५४ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आधीच भीषण दुष्काळाची स्थिती. अशा स्थितीत अपार कष्टातून मिळेल तेवढ्या पाण्यात कसा तरी ऊस पोसलेला असताना शार्टसर्किटने उसाचा कोळसा झाला. ऐन दुष्काळात या शेतक-यांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे.
भगवान रावसाहेब जाधव रा. वाकडी (ता. लातूर) यांनी गातेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास उसाला पाणी देण्यासाठी शेताकडे गेले असता दुपारी १२.४० च्या सुमारास गट नंबर १०९ मधील शामराव पंढरी सोमासे यांच्या शेतात असलेल्या विजेच्या डीपीला शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे त्यांच्या शेतातील उसाला आग लागली. ती आग भगवान जाधव व आजूबाजूच्या गट नंबर १०९ मधील दैवशाला बब्रुवान सोमासे, गट नंबर १०८ मधील भगवान पंढरी सोमासे, सिद्राम पंढरी सोमासे, नागनाथ पंढरी सोमासे, गजानन भगवान सोमासे, गट नंबर १०७ मधील नवनाथ नागोराव सोमासे, बब्रूवान रामराव सोमासे, वसंत रावसाहेब जाधव, राजाभाऊ शेषेराव सोमासे, गट नंबर १०५ मधील इंद्रजीत पंढरी सोमासे, भगवान रावसाहेब जाधव, आशा भागवत जाधव, मधुकर निवृत्ती जाधव, गट नंबर १०४ मधील रमेश नानासाहबे जाधव, नानासाहेब रामा जाधव, परमेश्वर त्र्यंबक जाधव, गट नंबर १०३ मधील भास्कर त्र्यंबक जाधव, दत्तात्रय सिद्राम जाधव यांचा एकूण ५२ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे अंदाजे ५४ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अग्निशामक दलाला
करावी लागली कसरत
उसाला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच विलास सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मोठ्या क्षेत्रात आगीने वेढा दिल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला खूप मोठी कसरत करावी लागली. या आगीत जळून उसाचे मोठे नुकसान झाले.
















