मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वाचन प्रेरणा दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील ३६५ दिवस वाचनाची प्रेरणा देणारा असावा. मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-याने पुढील वाचन प्रेरणा दिनापर्यंत किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री केंद्रांना मंत्री डॉ. सामंत यांनी भेट दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा, साहित्यिक योगदान आणि वाचन संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषा विभागाने विशेष उपक्रम राबविला. राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व आणि तिची अभिजात परंपरा समजावून सांगणा-या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दहा दिवसांत सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आल्याचे, आणि हा एक नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
आजच्या काळात वाचन संस्कृती कमी होत असल्याची चिंता व्यक्त करताना, केवळ वाचन प्रेरणा दिन साजरा करून उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर दैनंदिन जीवनात वाचनाची सवय रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मराठी भाषेचा अभिमान संवादातूनही व्यक्त व्हावा
मराठी भाषा शिकविण्याच्या विभागाच्या उपक्रमांतर्गत सुमारे एक लाख ६७ हजार जणांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठीतून संवाद साधण्याची सवय लावली, तर इतर भाषिकांना मराठी शिकण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची गरजच भासणार नाही, असा आशावाद मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
















