नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात जवळपास प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतातच. गेल्या काही काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही काळापूर्वी सोन्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी होती. मात्र आज त्याच्या सोन्याचा भाव हा १ लाखांवर पोहोचला आहे. आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळा अर्थात १० ग्रॅमची किंमत १,०२,६४० रुपये इतकी आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमतही जवळपास आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये हा दर कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे. एकेकाळी सोन्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये होती. पण जुलै २०२५ पर्यंत त्याच्या किमती १ लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. गेल्या ६ वर्षातील किमतींची तुलना केल्यास २००% ची वाढ दिसून येते. मग भविष्यात सोन्याच्या किमती किती वाढू शकतात?
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक तणाव हे सोन्याच्या किमती वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. याशिवाय आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीही वाढत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी सोनं हा नेहमीच एक सुरक्षित मार्ग राहिला आहे. एप्रिल २०२५ मध्ये, आपण पाहिलं की एमसीएक्समध्ये १० ग्रॅम सोन्याचे मूल्य १,०१,०७८ रुपयांपर्यत पोहोचले. सोन्याची ही हालचाल पाहून, तज्ञांचा अंदाज आहे की पुढील ५ वर्षांत १० ग्रॅम सोन्याची किंमत २,२५,००० रुपयांपर्यंत म्हणजेच तब्बल २ लाखांपर्यंत पोहोचू शकते. साल २०१९ ते २०२५ दरम्यान, सोन्याच्या किमती दरवर्षी १८% दराने वाढल्या आहेत. जर हे असेच चालू राहिलं तर किंमत २.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. मात्र, दुस-या एका अहवालात असे म्हटले आहे की, सोन्याचा बाजार एकत्रीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. जर एखादी मोठी घटना किंवा आंतरराष्ट्रीय तणाव नसेल तर किंमती स्थिर राहू शकतात. चीनने आपल्या विमा क्षेत्रातील एकूण मालमत्तेपैकी १% सोन्यात गुंतवले आहे. तसेच मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी कमी करत आहेत.

