मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी अनेक नेते आणि मंत्री हे वादाच्या भोव-यामध्ये अडकले आहेत. काही नेते हे हाणामारी करत तर काही नेते शिवीगाळ करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळत आहेत तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार आहे. यावरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आता थेट राष्ट्रपतींकडे राज्यातील नेत्यांची तक्रार केली जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने महाराष्ट्रातील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या तक्रारींबाबत राज्यपालांना निवेदन सादर केले होते. ठाकरे गटाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. मंत्र्यांवरील खटले, त्यांच्याविरुद्ध उपलब्ध पुरावे आणि त्यांच्या आक्षेपार्ह विधानांच्या आधारे ठाकरे गटाच्या शिवसेनेने राज्यपालांकडे लेखी तक्रार केली होती. यावर आता राज्यपाल सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देतात का? याची शिवसेना ठाकरे गट वाट पाहत आहे. मात्र राज्यपालांना निवेदन देण्यावर ठाकरे गट थांबलेला नाही. आता महाराष्ट्रातील बेशिस्त आणि बेताल वक्तव्य करणा-या राजकीय नेत्यांची तक्रार करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे आणि ही भेट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना सूचना मिळू शकतात
उद्धव ठाकरे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत, बैठकीनंतर राष्ट्रपती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. राज्यातील काही नेते हे वादाच्या भोव-यामध्ये अडकले आहेत. या वादग्रस्त नेत्यांची नावे मंत्री योगेश कदम, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, आमदार संजय गायकवाड, भरत गोगावले अशी आहेत. माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळल्याचे प्रकरण, शिरसाट यांनी पैशांनी भरलेली बॅग ठेवल्याचे प्रकरण, संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचे प्रकरण आणि योगेश कदम यांनी त्यांच्या आईच्या नावाने बेकायदेशीर बार चालवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने निषेध केला आहे.

