जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड पाण्याखाली
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मंगळवारी मुंबईत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड पाण्याखाली गेला. या रोडवर दीड ते दोन फूट पाणी भरले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच विमान सेवेवरही परिणाम झाला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वा-यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. अनेक विमानांना विलंब झाला. काही विमाने दुस-या मार्गाने वळवण्यात आली.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे मागील एक तासापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केल्याने अंधेरी पश्चिम एस. व्ही रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आला.
वादळी वा-यामुळे झाडे कोसळली
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली.फिल्म सिटीमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडली. मात्र, कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
















