लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील विलास बागेत सार्वजनिक आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जयपूर- अत्रौली घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचा भक्ती संगीत आणि संतवाणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला उजाळा देणे महत्त्वाचे आहे. विकासरत्न विलासराव देशमुख हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते एक सकारात्मक दृष्टिकोन असलेले नेते होते. त्यांनी आपल्या विचारांनी, धोरणांनी आणि विकास कामांनी महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेले. लोकसेवेला वाहिलेले त्यांचे जीवन, सुसंवादी नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आजही आपल्याला प्रेरणा देत राहते. त्यांनी राजकारण आणि विकास यांची सांगड घालून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला. अशा लोकनेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाच्या संतवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयपूर-अत्रौली घराण्याचे पंडित रघुनंदन पणशीकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक म्हणून ओळखले जातात. त्यांची गायनशैली या घराण्याची अनन्य साधारण ओळख दर्शवते, ज्यामध्ये भरलेला आकार, तान, लयकारी आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड व गमक यांचा समावेश असतो.
ख्याल गायकी असो, भजन, ठुमरी, गझल किंवा नाट्यसंगीत, ते प्रत्येक प्रकार अगदी सहजतेने गातात. त्यांच्या या बहुआयामी प्रतिभेमुळे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांनी भारतच नव्हे तर युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमध्येही आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक ९ वाजता होणार असून देशमुख कुटुंबीयांच्या वतीने सर्वांना सकाळी ठीक ८.५५ वाजेपूर्वी विलास बागेतील स्मृतीस्थळी स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे करणार आहेत.

