माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर : प्रतिनिधी
देशाच्या विकासात शेती अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे. आपल्या देशातील ६० टक्के अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतक-यांच्या विकासासाठी समृद्धीसाठी, केवळ राजकारण करून चालणार नाही. सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी लागते. विकासात सहमती व सहकार्य व चर्चा करणे अपेक्षित असते. साखर कारखानदारी ही जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाचा कणा असून ही कारखानदारी चालली पाहिजे, टिकली पाहिजे यासाठी पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि. ११ जुलै रोजी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औशाचे आमदार अभिमन्यू पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, औसा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राच्चटे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार, गोरे, संदिपान शेळके, माजी अध्यक्ष संतोष देशमुख, माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, माजी संचालक सुनील उटगे, कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, किरण बाबळसुरे, सचिन दाताळ, राजेंद्र भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, जगात अनेक देशाची अर्थव्यवस्था ही औद्योगीकरणावर अवलंबून आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबले होते. तेथील अर्थव्यवस्था कोलमडली होती. फक्त आपल्या देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली कारण येथील अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. देशातील ६० टक्के लोकांचा अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीतील शेतकरी समृद्ध करायचा असेल तर सहकार्य, चर्चा व सहयोग आवश्यक आहे.
मांजरा परिवाराच्या माध्यमातून गेल्या वर्षी साधारणत: ५० लाख टन उसाचे गाळप होऊन शेतक-यांना १५०० कोटी रुपये तर वाहनधारकांना ४५० कोटी रुपये वाटप करण्यात आले. साधारण २ हजार कोटी रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व्यापारी व वाहनधारक यांच्या हातात आले आहेत. शेतक-यांच्या खात्यावर वेळेवर पैसे जमा झाले तरच आपल्या कारखानदारी चांगली चालली, असा याचा अर्थ होतो. या जिल्ह्यातील कारखानदारी व्यवस्थित चालली पाहिजे व समृद्ध झाली पाहिजे यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर व औशाच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. मारुती महाराज कारखान्यास एलसीडीसीकडून ११० कोटी रुपये मिळवून देण्यात त्यांचे मोठे सहकार्य आहे आणि सहकार्य व मदत करणा-यास कधीही विसरायचे नसते, ही आपल्या नेते मंडळींनी दिलेली शिकवण आहे. म्हणून या कार्यक्रमास आमदार अभिमन्यू पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याविषयी संचालक मंडळांनी विनंती केली होती. आमदार पवार यांनी या कारखान्यात सहकार्य केले आहे. आता यापुढील कालावधीत केंद्र सरकारकडून साखरेचे भाव वाढीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले व आमदार पवार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.
यावेळी बोलताना आमदार पवार यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे अजात शत्रू असून विकासाचे राजकारण करताना त्यांनी शिस्त पाळली म्हणूनच साखर कारखानदारी यशस्वी होऊ शकली. त्यांच्यापासून आपण काही गोष्टी शिकलो आहोत. विकासात राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असावे हा लोकनेते विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांचा मंत्र आजही लातूर जिल्ह्यात पाळला जातो. विकासात एकमेकांना सहकार्य करण्याची येथील भूमिका आगामी काळातही चालूच राहील. विकासासाठी जिथे दिलीपरावजी देशमुख असतील तेथे मी आहे, असा शब्द यावेळी दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले तर आभार माजी चेअरमन तथा संचालक गणपतराव बाजुळगे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सदाशिव बहिर यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















