लातूर : प्रतिनिधी
काल दि. २७ जून २०२५ रोजी जूने गुळ मार्केट चौक ते राजर्षी शाहू महाविद्यालय कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. जेसीबीने खड्डा करताना निष्काळजीपणे जतन केलेल्या तीन झाडांच्या मुळा उखडल्या आणि झाडं उन्मळून पडली. मात्र लातूर शहर महानगरपालिकेने त्याची कसलीही दखल घेतली नाही. विकास कामांच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्यामुळे लातूरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केला जात आहे.
लातूरमध्ये अगोदरच ग्रीन कव्हर खुप कमी आहे. परिणामी पर्जन्यमान आणि पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आणि शासनाच्या वनीकरण विभागाच्या वतीने लातूर शहरात वृक्षाारोपण आणि त्याचे संवर्धन करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. परिणामी शहरात झाडांची संख्या ब-यापैकी वाढलेली दिसून येत आहे. परंतू, ज्या प्रमाणात वृक्षारोपन केले जात आहे. त्याच्या दुप्पट प्रमाणात वृक्षतोडही होत असलााचे चित्र पहावयास मिळत आहे. मोठ्या संख्येने वृक्षतोड हा मानवी हत्येपेक्षाही वाईट आहे. ही बाब वृक्षतोड करणा-यांना का समजत नाही, हे विशेष.
लातूर शहरातील वृषवल्ली वाढावी म्हणुन काही सेवाभावी संस्था गेल्या ५ वर्षांपासून वृक्ष लागवडीसह वृक्षसंवर्धनाचे काम स्व खर्चाने करीत आहेत. झाडांना टँकरने पाणी देण्यापासून त्याला आधार देणे, झाळी लावले, झाडाच्या भोवतालची साफसफाई करणे आदी सर्व कामे या संस्था स्वत: करतात. शहरातील सगळ्या झाडांच्या छाटण्या करून त्यांना आकार दिला जात आहे. तर काही यंत्रणा झाडांची कत्तल करीत असताना प्रशासन कुठलीही दखल घेत नाही. रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना झाडाभोवती दीड बाय दीडची मोकळी जागा सोडणे आवश्यक असते. पेव्हर ब्लॉकचे काम करताना झाडांच्यामुळाना धक्का लागू नये हे अपेक्षित असते. ज्या ठिकाणी झाडं नाहीत त्या ठिकाणी भविष्यात झाडं लावण्याकरिता पेव्हर ब्लॉकच्याऐवजी सिमेंटची रिंग लावणे आवश्यक असते. परंतु, असे कुठेही होताना दिसत नाही, झाडांच्या मुळाभोवती पूर्णपणे सिमेंट काँक्रीट केले जात आहे. याची माहिती वारंवार प्रशासनाला दिली जाते तरीही प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.