मुंबई : मुंबईतून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळली. डोंगराळ भागातील माती व दगड घसरून एका झोपडीवर कोसळले. या अपघतात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ( १६ ऑगस्ट ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळी ५.५० वाजता अधिकृत अद्ययावत माहिती देण्यात आली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल , पोलिस व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले.
राजावाडी रुग्णालयाचे डॉक्टर निखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण मृतावस्थेत रुग्णालयात आणले गेले, तर दोघांवर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. यात सुरेश मिश्रा (५०, पुरुष) आणि शालू मिश्रा (१९, महिला) यांचा मृत्यू झाला असून आरती मिश्रा (४५, महिला) आणि ऋतुराज मिश्रा (२०, पुरुष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

