लोकसभेच्या राज्यातील अखेरच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शनिवारी समाप्त झाली. या निमित्ताने सुरू असलेला विखारी प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थंडावल्या. राज्यातील अखेरच्या टप्प्यासाठी आज २० मे रोजी (सोमवार) १३ जागांसाठी मतदान होईल. पाचव्या टप्प्यात मुंबई महानगर, नाशिक, धुळे, ठाणे, कल्याण, दिंडोरी, पालघर, भिवंडी मतदारसंघातील २ कोटी ४६ लाख मतदार २६४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघांत २४ हजार ५७९ मतदान केंद्रे असून त्यापैकी १६० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात शनिवारी सायंकाळी ६ वाजता समाप्त झाला. अखेरच्या क्षणी आपल्या मतदारांना साद घालण्यासाठी राजकीय पक्षांची धांदल उडाली होती.
शनिवारी मुंबई व ठाण्यात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो वा रॅली केल्या. अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जोरदार प्रचार केला. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रचारात एकमेकांवर जोरदार आरोप केले. भाजपच्या प्रचाराचा भर प्रामुख्याने काँग्रेस आणि हिंदू-मुस्लिम वादाभोवतीच राहिला.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खालच्या पातळीवर व्यक्तिगत टीकेची झोड उठवल्याने प्रचाराचा स्तर घसरल्याचे दिसून आले. देशात पाचव्या टप्प्यात ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील ४९ जागांवर मतदान होणार आहे. एकूण ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, चिराग पासवान आदी दिग्गज आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. पाचव्या टप्प्यात राज्यात आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. महायुतीकडून पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. पाचव्या टप्प्यातील प्रचार संपताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींबाबत एक मोठे विधान केले. लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी देशात मोदींच्या बाजूने वातावरण होते. सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. मात्र नंतर अशा काही गोष्टी घडल्या की त्यामुळे वातावरण फिरले आणि महाविकास आघाडीला लोकांचे पाठबळ मिळत गेले.
प्रारंभी ‘अब की बार चारसौ पार’ अशा बाता मारणारे आता खासगीत २५०-२६० जागा मिळतील असे म्हणू लागले आहेत. मोदींनी बेफाम आणि बेताल वक्तव्ये करून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे असे म्हणता येईल. टीव्हीवरच्या जाहिरातींपासून ते रस्त्यावरच्या फ्लेक्सपर्यंत, टी शर्टपासून ते चौकाचौकात फिरणा-या डिजिटल स्क्रीनवर भाजपच्या चारशे पार जाहिरातींचा बोलबाला दिसत होता. मोदींचा फोटो लावून भाजपने ही टॅगलाईन अशी काही लोकांपर्यंत पोहोचवली की लोकसभेला फक्त आणि फक्त मोदींचाच करिष्मा चालेल असे वाटत होते. पण लोकसभा निवडणुकीचे मतदान पाचव्या टप्प्यावर येऊन पोहोचले आणि भाजपच्या ‘चारशे पार’ घोषणेचा फज्जा उडाल्याची चर्चा आहे. गत दहा वर्षांत भाजपच्या अनेक घोषणा गाजल्या. ‘अच्छे दिन आएंगे’, ‘अब की बार मोदी सरकार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मोदी है तो मुमकीन है’ आदी घोषणांतून भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असे चित्र निर्माण केले गेले. या घोषणांच्या गदारोळात विरोधकांच्या कोणत्या घोषणा होत्या ते आठवत नाही. आता ‘मोदी की गॅरंटी’चा वादा करण्यात आला आहे.
भाजपच्या घोषणांचा फज्जा उडण्यास कारणीभूत ठरले ते कर्नाटकचे खासदार अनंत कुमार हेगडे यांचे वक्तव्य. हेगडे म्हणाले, भाजपला चारशेहून अधिक जागा हव्या आहेत, कारण दोन तृतीयांश बहुमत असेल तर संविधानात सुधारणा करता येणार! विरोधकांना आयते कोलित मिळाले. विरोधकांनी ही देशातली शेवटची निवडणूक असून मोदी यापुढे हुकूमशहा बनतील असा प्रचार सुरू केला आणि भाजपच्या प्रचारतंत्राचे तीन तेरा वाजले. मुस्लिम समाजासंबंधीची मोदींची वक्तव्ये भाजपला भोवणार असे दिसते. शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची तर बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची जंगी सभा झाली. दोन्ही सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता मतदान कुणाच्या बाजूने झाले ते ४ जून रोजीच कळू शकेल. पंतप्रधान मोदींनी तिहेरी तलाक, राम मंदिराचा प्रश्न सोडवला असा दावा केला जात आहे.
परंतु यामागे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे हे विसरून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नसता तर अजूनही राममंदिर अस्तित्वात आले नसते. भाजपला पराभव दिसू लागला आहे असे बोलले जात आहे. जनतेने आता निवडणूक हातात घेतली आहे असे महत्त्वाचे विधान काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केले आहे. अर्थात याचा फैसला जनतेच्या दरबारातच होईल. देशातील मतदार सुज्ञ आहेत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सत्ताधारी, विरोधक काहीही बोलत असले, थापा मारत असले तरी मतदार राजा सारे शांतपणे ऐकत असतो. आपल्या हिताचे निर्णय घेण्यास मतदार सक्षम आहेत, विखारी प्रचार करणा-यांना ते त्यांची जागा दाखवून देतील यात शंका नाही. लोकप्रियतेच्या जोरावर आपणच सत्तेवर राहू अशा भ्रमात असाल तर तो मोडून काढण्यास मतदार सिद्ध आहे.