अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उड्डाण होताच काही क्षणांतच नागरी वस्तीत कोसळले. या दुर्घटनेत एक प्रवासी वगळता पायलट व केबिन क्रूसह २४१ प्रवाशांची स्वप्ने विखुरली गेली, स्वप्नांची राखरांगोळी झाली. आसन क्र. ११ वरील रमेश विश्वासकुमार हा प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते. विमान नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळल्याने २४ डॉक्टरांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मराठी हवाई सुंदरी आणि महाराष्ट्रातील ९ प्रवाशांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील ५० हून अधिक डॉक्टर जखमी झाल्याचे सांगितले जाते. विमानातील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. एअर इंडियाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी देण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमानाने ८०० फुटांची उंची गाठली नाही तोच पाचच मिनिटांत ते विमानतळापासून काही अंतरावर मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन, ७ पोर्तुगीज नागरिक होते.
११ लहान मुले, २ बालके, २ पायलट आणि १० क्रू मेंबर होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच कॅप्टन सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला ‘मेडे’ म्हणजे ‘मदत करा’ असा संदेश दिला. मात्र, त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि मोठी आग लागून विमान डॉक्टरांच्या वसतिगृह इमारतीवर कोसळले. अपघातानंतर भीषण स्फोट झाला आणि परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले. दुर्घटनेत विमानाचे तुकडे झाले. वसतिगृहाच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. दुर्घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बडोदा आणि सुरत येथूनही बचावपथकांची मदत घेण्यात आली. इमारतीतील गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए तपासणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विमानातील प्रवाशांचे कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक, विशेषत: पालक आणि मुले यांना आपले नमुने संबंधित ठिकाणी जमा करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
जेणेकरून पीडितांची लवकरात लवकर ओळख पटवता येईल. संकट समयी प्रत्येकजण मदतीसाठी धाव घेतो हे खरे आहे. परंतु अपघात का झाला याची कारणे त्वरित शोधायला हवीत आणि पुन्हा असे अपघात होऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजनाही झाली पाहिजे. विमानात तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार आकाश वातसा नामक एका प्रवाशाने अपघाताच्या काही क्षण आधी एक्स पोस्टद्वारे केली होती म्हणे. त्याने याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता. त्यानंतर हेच विमान अहमदाबादहून लंडनसाठी रवाना झाले होते. विमानातील एसी बंद होता. स्क्रीन टच टीव्ही काम करत नव्हते. फक्त स्क्रीन चालू होता पण काहीच दिसत नव्हते. लाईटही बंद होती. क्रू मेंबर्सना बोलावण्यासाठी असलेले कॉल बटणदेखील काम करत नव्हते असे आकाश वातसाने म्हटले आहे. असे असेल तर विमानात नक्कीच काही तरी बिघाड असला पाहिजे. विमानात १ लाख २५ हजार लिटर इंधन भरण्यात आले होते म्हणे. म्हणजे ते मर्यादेपेक्षा अधिक भरण्यात आले होते का याचीही चौकशी करायला हवी. विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्याची जबाबदारी एएआयबीकडे(एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) सोपविण्यात आली आहे. तपासासंदर्भात सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयारी ठेवली असून आपण ‘एअर इंडिया’च्या संपर्कात असल्याचे ‘बोईंग’ने जाहीर केले आहे.
अमेरिकास्थित ‘नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड’ने भारताला तपासात मदत करण्याची घोषणा केली आहे. हे सारे होणार असले तरी गेलेले जीव परत येणार नाहीत, हे खरे असले तरी भविष्यात अशा प्रकारे जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ हे खरेच आहे. म्हणूनच आसन क्र. ‘११ए’वरील रमेश विश्वासकुमार हा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक मृत्यूला चकवा देण्यात यशस्वी झाला. विमान धडकल्यानंतर लागलेल्या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला पण रमेशला आगीची झळ पोहोचली नाही. थोड्याफार जखमी अवस्थेत तो चालत रुग्णवाहिकेत गेला. लंडनला राहणा-या भूमीबेन चौहान काही महिन्यांपूर्वी अहमदाबादला आल्या होत्या. त्या या विमानाने लंडनला परत जाणार होत्या. पण ट्रॅफिक जॅम झाल्याने त्या विमानतळावर १० मिनिटे उशिरा पोहोचल्या. तोपर्यंत विमानाची दारे बंद झाली होती…. नव्हे, त्यांच्यासाठी मृत्यूचे दार बंद झाले होते. दुर्घटनाग्रस्त बोईंग विमान समस्यांनी घेरले होते काय याची कसून चौकशी झाली पाहिजे. ड्रीमलायनर बोईंग ७८७ ही विमाने अमेरिकेच्या बोईंग कमर्शियल एअरप्लेन्स या कंपनीची आहेत.
१५ डिसेंबर २००९ रोजी या विमानाने पहिले उड्डाण केले. २६ एप्रिल २००४ रोजी या कंपनीने ‘ऑल निप्पॉन एअरवेज’साठी या विमानाचे उत्पादन सुरू केले. सुरुवातीला यात अनेक अडचणी आल्या पण त्यात सुधारणा करण्यात आली. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते २० टक्के इंधनाची बचत करते. सुरुवातीला अनेकवेळा बोईंगच्या इंजिनात समस्या आढळल्या, त्या दूर करण्यात आल्या. २०१३ मध्ये इंधन गळतीची समस्या लक्षात आली, ती दूर करण्यात आली. या समस्येमुळे जपान एअरलाईन आणि युनायटेड एअरलाईनची दोन उड्डाणे रद्द करण्यात आली होती. लिथियम बॅटरीची समस्या, इंधन गळती, विमानाचा वेग दाखवणा-या यंत्रणेत बिघाड, झडपांची समस्या अशा अनेक समस्या या विमानासंदर्भात येत राहिल्या. एअर इंडियाचे हे विमान १२ वर्षांपासून सेवा देत होते. त्यामुळे ते कालबा झाले होते का याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कॅप्टन सुमीत सभरवाल यांना ८२०० तासांचा विमान उड्डाण अनुभव होता. तेही अपघात टाळू शकले नाहीत याचा अर्थ काय?