शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
देशाचे वातावरण आज पूर्णत: बिघडले असून हा चिंतेचा विषय आहे. राज्यकर्ते सत्तेसाठी सहिष्णुतेच वाटोळे करत असून सत्य सांगणा-यास गोळ्या मिळत असतील तर इथले राज्यकर्ते देशाला नेमके कुठे घेऊन जात आहेत. सत्य सांगणारांचा दाभोळकर होत असेल तर हे खुप चिंताजनक असून लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे विचारवंतांनी लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काम करावे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले.
श्री नवयुवक वाचनालय यांच्या वतीने शिवराज पाटील चाकूरकर साहित्य नगरी शिरूर अनंतपाळ येथे आयोजित दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते.मंचावर स्वागताध्यक्ष एल.बी.आवाळे, प्रभाकरराव कुलकर्णी, डॉ.मन्मथ भातांब्रे, प्राचार्य मधुकर सलगरे, काशिनाथराव देवंगरे, बालाजी येरोळे, शिवाजी मादलापुरे, रामकिशन गड्डीमे, डॉ. राजकुमार बोपलकर, सुधीर लखनगावे, संतोष शिवणे यांची उपस्थिती होती.
२७ ते २८ डिसेंबर अशा या दोन दिवसीय साहित्य संमेलनात एकूण आठ सत्र झाले. यात ग्रंथ दिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळा, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कवी संमेलन, बालमेळावा – कथाकथन, संतांचे योगदान, महिला सबलीकरण, शेती वर्तमान व भविष्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगता समारोप कार्यक्रमाचा समावेश आहे. प्रास्ताविक सा.सं.संवर्धन मंडळाचे बालाजी येरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन इंजि.किरण कोरे यांनी तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा सुनिता देवशटवार यांनी आभार मानले. या साहित्य संमेलनात साहित्यीक, कवि,वाचकांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला तर रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी श्री नवयुवक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

