पुणे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहेत. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ २४ तास उलटत नाहीत तोच एक नगरसेविका आपल्या हातगाडीवर फळविक्री करताना दिसल्या.
संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मावळ व लोणावळा परिसरात त्यांच्या साधेपणा, कष्ट व लोकशाही मूल्यांची विशेष चर्चा होत आहे. ‘मतदारांनी दाखवलेल्या विश्वासास सार्थ ठरवत, आपला मूळ व्यवसाय कधीही सोडणार नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
लोणावळा नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून भाग्यश्री जगताप या आपल्या मूळ फळविक्रीचा व्यवसाय ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी पोहोचल्या अन् नगरसेविका झाल्यानंतरही हा व्यवसाय अभिमानाने सुरू ठेवत राजकारणातील सकारात्मक चित्र उभे केले आहे. गेल्या २० वर्षांपासून फळविक्रीच्या व्यवसायातून त्या संसाराचा गाडा चालवत आहेत. राजकारणात एन्ट्री करणा-या नव्या कार्यकर्त्यांसमोर भाग्यश्री जगताप या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
भाग्यश्री जगताप या सकाळी-दुपारी पेरू विक्री करतात, त्यातून मिळणा-या पैशातून त्या आपली उपजीविका चालवतात. निवडणूक प्रचार काळातही त्यांनी आपला फळविक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करत होत्या.. आमदार सुनील शेळके यांनी भाग्यश्री जगताप यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती.
नगरसेविका झाल्यानंतरही त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय न सोडता, निकाल जाहीर होताच हातगाडी लावून पुन्हा व्यवसाय सुरू केला, हे विशेष उल्लेखनीय ठरले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणा-या भाग्यश्री जगताप यांना १४६८ मते मिळाली, तर भाजपच्या रचना विजय सिंनकर यांना ८६० मते मिळाली.

