22.5 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeलातूरविजयादशमीचा पर्व अभूतपुर्व उत्साहात साजरा

विजयादशमीचा पर्व अभूतपुर्व उत्साहात साजरा

लातूर : प्रतिनिधी
विजयादशमीचा सण क्षात्रतेजाचे दर्शन घडवणारा पर्व आहे. दि. १२ ऑक्टोेबर रोजी सायंकाळी शहरात विजयादशमी (दसरा) उत्साहात साजरा करण्यात आला. सामुदायिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विविध देखाव्यांसह भव्य मिरवणुक काढण्यात आली. क्षात्रतेजाच्या पर्वाचा अभूतपुर्व उत्साह या मिरवणुकीत पहावयास मिळाला. शहरातील श्री जय जगदंबा देवीच्या मंदीरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेला विजयादशमीचा सण उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने सामुदायिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने येथील गांधी चौकातील आर्य समाज येथून भव्य मिरवणुक काढण्यात आली. महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नांदेड रोड मार्गे ही मिरवणुक दसरा पार्कवर पोहोंचली. तेथे क्षात्रतेजाचे दर्शन घडवणारे लाठी, काठी, तलवार पथकांचे प्रदर्शन झाले. या भव्य मिरवणुकीत श्रीराम, लक्ष्मण, नवदुर्गा देवींचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे, झांसीची राणी पथक, अश्व ध्वजरक्षक, लाठी, काठी पथक, तलवार प्रदर्शन पथक, ढोल-ताशा पथकांचा सहभाग होता. मिरवणुकीत महिलांचा लक्षणिय प्रतिसाद होता. शहरात नवरात्र महोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.

यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, उपक्रम घेण्यात आले. आराधी, गोंधळ घातला गेला. विजयादशमीच्या दिवशी सकाळपासूनच शहरातील श्रद्धास्थान असलेल्या गंजगोलाई मंदिरात जय जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. येथील अंबिका देवी, कालिकादेवी, दुर्गादेवी, पद्मावती देवी, हिंगुलांबिका देवी आदी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या दिवशी सीमोल्लंघनाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे सायंकाळी शहराच्या विविध भागात लातूरकरांची गर्दी होती. या सणाच्या निमित्ताने आपट्याची पाने देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विजयादशमी उत्सहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातील ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना करुन नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी दुपारनंतर वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. शहरातही सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR