मुंबई : प्रतिनिधी
साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या लग्नाच्या तारखाही समोर आल्या, मात्र चाहत्यांना त्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.
इतकेच नाही तर, रश्मिका आणि विजयने या पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाला ‘द वेडिंग ऑफ विरोश’ असे नाव दिले असून, हे नाव का निवडले यामागचे कारणही सांगितले आहे. खरं तर, या नावामागे कोणताही वेडिंग प्लॅनर किंवा कौटुंबिक परंपरा नसून, हे नाव त्यांच्या चाहत्यांनी अनेक वर्षांपूर्वी प्रेमाने दिले होते.
चाहत्यांनी दिलेले हे नाव हळूहळू प्रेम आणि भावनेचे प्रतीक बनले आणि आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणाची ती ओळख बनली आहे. त्यामुळेच त्यांनी हे नाव आपल्या चाहत्यांना समर्पित केले आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, आमच्या लाडक्या चाहत्यांनो, जेव्हा आम्ही दोघांनी काहीही ठरवले नव्हते, तेव्हा तुम्ही आमच्या सोबत होता. तुम्ही आम्हाला प्रेमाने एक नाव दिले. तुम्ही आम्हाला ‘विरोश’ म्हणालात.
आज आमची नवीन सुरुवात ‘द वेडिंग ऑफ विरोश’ या तुम्ही दिलेल्या नावाने करत आहोत. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये लग्नाची तारीख किंवा ठिकाण दिलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लग्नाची एक पत्रिका व्हायरल झाली होती, ज्यामध्ये २६ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा आणि त्यानंतर ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन असल्याचे म्हटले होते.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ या सुपरहिट चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतरच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, ‘गीता गोविंदम’ प्रदर्शित झाल्यानंतर बरोबर एका महिन्यात रश्मिकाने तिचा को-स्टार रक्षित शेट्टीसोबतचा साखरपुडा मोडला होता, ज्याची मोठी चर्चा झाली होती.

