27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeराष्ट्रीयविजय रुपानी यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विजय रुपानी यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये विमानातील एक प्रवासी सोडून सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आता मृतांचा आकडा २७५ झाला असून यामुळे देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताच्या तीन दिवसांनंतर रुपाणी यांचा मृतदेह सापडला असून आज (दि.१६) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे शासकीय इतमानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांसारखे ज्येष्ठ भाजप नेते रुपानी यांच्या उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

रविवारी (दि.१५) माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांच्या मृतदेहाचे डीएनए सॅम्पलिंग करण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने राजकोटला नेले जाईल. तिथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार आज (दि.१६) सायंकाळी पाच वाजता केले जातील. त्याआधी, त्यांचे पार्थिव पुजित सोसायटी येथे ठेवण्यात आले आहे जिथे त्यांचे कुटुंब, समर्थक, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहणार आहेत.

८७ मृतदेहांची ओळख पटली
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात विमान प्रवासी, क्रू मेंबर्स आणि डॉक्टर असे मिळून २७०जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या चार दिवसांपर्यंत ८७मृतांची डीएनए मॅचिंगद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये आत्तापर्यंत ४७जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. १२ जून रोजी झालेल्या या अहमदाबाद विमान अपघातात अनेक लोक इतके गंभीरपणे भाजले होते की त्यांचे मृतदेह ओळखता येत नव्हते, त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती अतिरिक्त नागरी अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी माध्यमांना दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR