मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे एक्स (ट्विटर) अकाऊंट हॅक झाले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अकाऊंट सुरक्षितपणे पुन्हा माझ्या ताब्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं अधिकृत (ट्विटर) अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. वडेट्टीवार यांनी स्वत:च याबाबत लोकांना सतर्क केले असून, अकाऊंट पुन्हा सुरक्षितपणे रिकव्हर होईपर्यंत त्यावरून होणा-या कोणत्याही हालचालींशी आपला किंवा आपल्या कार्यालयाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीचे अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिक आणि कार्यकर्त्यांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: हॅक झालेल्या अकाऊंटवरून येणा-या संशयास्पद पोस्ट, मेसेज किंवा लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
‘पोस्ट किंवा मेसेजशी माझा संबंध नाही’
वडेट्टीवार यांनी अकाउंट हॅक झाल्याची माहिती देताना, सध्या त्यांच्या हँडलवरून होणा-या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कृतीशी त्यांचा अथवा त्यांच्या कार्यालयाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने एखादी नवी पोस्ट किंवा मेसेज दिसल्यास तो अधिकृत आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.
















