लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लाईटच्या खांबावरील अॅल्युमिनियम धातूच्या विद्युत तारा चोरीच्या घटना घडत होत्या. या संदर्भातील अनेक गुन्हे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. नमूद गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने व जलदगतीने करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी सर्व गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते.
या सूचनांच्या अनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. दिनांक २५ ऑक््टोंबर रोजी दुपारी अंदाजे २.०० वाजता, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, लाईटच्या खांबावरील अॅल्युमिनियम विद्युत तारा चोरी करणारे आरोपी लातूर-नांदेड महामार्गावर कृषी महाविद्यालय, लातूर समोर पांढ-या रंगाच्या छोट्या मालवाहू टेम्पोसह थांबलेले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचला असता व सदर ठिकाणी तपासणी केली असता टेम्पो क्रमांक एमएच २३ ए.यु. ४४८३ जवळ चार इसम आढळले. त्यापैकी एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला, तर रमेश गोविंद शेलुरे, वय २४ वर्षे, रा. लातूर रोड, ता. चाकूर, जि. लातूर, दत्ता गोविंद शेलुरे, वय ३० वर्षे, रा. लातूर रोड, ता. चाकूर, जि. लातूर, अशोक रामचंद्र मुकटमोरे, वय २८ वर्षे, रा. बसस्थानक जवळ, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर यांना ताब्यात घेण्यात आले तर पळून गेलेला आरोपी अशोक चंदर मुकटमोरे, वय अंदाजे ३० वर्षे, रा. आरीमोड, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर (फरार) असे असून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून वरील टेम्पोची व त्यांच्या ताब्यातील साहित्याची झडती घेतली असता अॅल्युमिनियम विजेच्या तारेचे बंडल (एकूण वजन २२५ किलोग्रॅम) व रोख रक्कम रु. ५,००,०००/- (चोरी केलेल्या तारेची विक्री करून मिळवलेली) मालवाहू टेम्पो (महिंद्रा जितो) किंमत रु. ५,००,०००/- असा एकूण रु. १०,६७,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते चौघेजण गेल्या चार महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून विद्युत तारा चोरी करत होते. सदर तिन्ही आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासासाठी पोलीस ठाणे किनगाव (गु.र.नं. २४०/२०२५) येथे दाखल गुन्ह्यात सादर करण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरु आहे. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड , राजेश कंचे, विनोद चलवाड, मोहन सुरवसे, रामलिंग शिंदे, गणेश साठे, शैलेश सुडे व प्रदीप चोपणे यांनी केली
आहे.
















