नागपूर : प्रतिनिधी
रात्रभर काम करून विटा घेऊन निघालेल्या मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. विटांखाली दबून ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील ईसापूरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पहाटे उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघांवर जवळच्या सरकारी रूग्णलायात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथून मोवाडकडे ट्रक जात होता. नसावनेर मार्गावर ईसापूर गावाजवळ पहाटे दुर्दैवी अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला.
रात्री विटांचा ट्रक भरून घराकडे मजूर निघाले होते. काम केल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ६ मजूर गाढ झोपेत होते, पण त्याचवेळी काळाने झडप घातली. भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन उलटला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. संजय कनेरे, लीलाधर वालूलकर आणि अजित भलावी अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष धुर्वे अशी जखमींची नावे आहेत.
















