26.3 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भात वादळी पावसाचा कहर; जनावरांचा मृत्यू आणि पिकांचे मोठे नुकसान

विदर्भात वादळी पावसाचा कहर; जनावरांचा मृत्यू आणि पिकांचे मोठे नुकसान

वाशिम : प्रतिनिधी
राज्यात पंधरा जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मोसमी पावसापूर्वीच निसर्गाचा तडाखा बसला असून, ११ जून रोजी झालेल्या वादळी पावसाने यवतमाळ, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. जोरदार वा-यांसह मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये हाहाकार
यवतमाळ जिल्ह्याच्या यवतमाळ, आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी, कळंब, वणी आणि नेर या ९ तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली. एकूण १८१५ घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी १० घरे पूर्णत: कोसळली आहेत.१० गोठ्यांचेही नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीत ५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

शेतीचेही प्रचंड नुकसान
पावसामुळे १६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये विशेषत: केळी, संत्रा, लिंबू, पपई, तीळ, ज्वारी व इतर फळबागा या पिकांचा समावेश आहे. जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके अक्षरश: जमीनदोस्त झाली आहेत.

वीज पुरवठा खंडित, झाडे कोसळली
वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब व तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी नागरिकांना रात्र उघड्यावर काढावी लागली.

दर्यापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात, विशेषत: नांदरुण परिसरात, ढगफुटीस्दृश पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तर रामतीर्थ येथे वादळी वा-यामुळे घरांची व झाडांची मोठी पडझड झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, नागरिकांचे अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भिजले. विशेषत: रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR