नागपूर : राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने एकच हाहाकार केल्याचे चित्र आहे. तर विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरित बाधित जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता सर्व स्थरांतून होऊ लागली आहे. असे असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे भीषण वास्तव आता समोर आले आहे. राज्याची उपराजधानी नागपूर विभागात गेल्या ८ महिन्यांत तब्बल २९६ शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे विदारक चित्र आहे.
दरम्यान, सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचे बोलले जात असून गेल्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक ५० शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. तर गेल्या ऑगस्ट महिन्यात २८ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. सोबतच गेल्या आठ महिन्यांत आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदतीपोटी १ कोटी ५८ लाख रुपयांचा मदतनिधी वितरित केल्याची माहिती कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.
शेतकरी नेत्यांची वर्ध्यात हजेरी
वर्ध्यात १७ सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क न्याय परिषद आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात शेतकरीविरोधी काळे कायदे सरकारला मागे घ्यायला भाग पाडणारे शेतकरी नेते यात सहभागी होणार आहेत. राकेश टिकैत, युद्धवीर सिंग, अशोक ढवळे, अनिल त्यागी, अजित नवले, बच्चू कडू, विजय जावंधिया हे यात सहभागी होणार आहेत. सध्या देशात असलेली शेतक-यांची बिकट परिस्थिती पाहता शेतक-यांनी एकत्र येत मोठा लढा देण्याची गरज आहे. या शेतकरी हक्क परिषदेमध्ये विदर्भातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या न्यायाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. कापसावरील आयात बंदी उठविण्यात आल्याचा जाब यातून विचारला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अविनाश काकडे आणि यशवंत झाडे यांनी दिली आहे. यादरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या जाणार आहेत.
मराठवाड्यातील आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका शेतीला बसल्याने बळिराजाला दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेस राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.
….
















