परभणी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळ प्रकरणाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्या कथित प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
परभणी शहरातील उपोषण मैदान येथे सोमवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात परभणी भाजप महिला मोर्चाच्या महानगर सरचिटणीस तथा जिल्हा महिला मोर्चा प्रतिनिधी मंगल अनिल मुदगलकर, जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सारिका पारवे, सोशल मीडिया प्रमुख रूपाली ठाकरे, प्रभावती अन्नपुर्वे, विजया कातकडे, दीपाली वाघ, अपर्णा जोशी, रोहिणी हलगे, बालिका सुरनर, किर्ती क्षीरसागर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनादरम्यान काँग्रेस खा. डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावरील कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाने तीव्र निषेध नोंदविला. खा. डॉ. अंगोमचा यांनी तातडीने राजीनामा द्यावा.काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी भाजपा महिला मोर्चा पदाधिका-यांनी केल्या.
महिला सुरक्षेच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांनी कोणताही दुजाभाव न करता पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे मत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केले. यावेळी विविध घोषणांचे फलक हातात घेऊन काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला होता. भाजपा महिला मोर्चाच्या या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले.
















