28.2 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeलातूरविद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी गांधी चौकात नातेवाईकांचा रास्ता रोको

विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी गांधी चौकात नातेवाईकांचा रास्ता रोको

लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी टाका, ता. औसा येथील अनुष्का किरण पाटोळे या सहावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली असे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणी काही तरी काळेबेरे आहे. या घटनेत तेथील प्रशासनाच्या विरोधात मृत्यूस कारण असल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलीच्या नातेवाईकांनी अचानक महात्मा गांधी चौकात आक्रोश व्यक्त केला. अक्षरश: साड्या, कपडे याची दोर करून रास्ता रोको केला. बराच वेळ या महिलांच्या आक्रोशामुळे चौकात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
लातूरच्या जवाहर नवोदय निवासी विद्यालयात औसा तालुक्यातील टाका येथील अनुष्का पाटोळे ही विद्यार्थीनी सहावीमध्ये शिक्षण घेत होती. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विद्यालय प्रशासनाने मुलीच्या नातेवाईकांना तुमची मुलगी आजारी आहे. तिच्यावर उपचार चालू आहेत म्हणून कळविले. तो पर्यंत त्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. नंतर मुलीच्या नातेवाईकांना मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. क रविवारी सकाळी हा प्रकार घडल्यापासून दिवसभर मुलीचे नातेवाईक आक्रोश व्यक्त करीत होते. गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली. आज सोमवार रोजी दुपारी प्रेताचे शवविच्छेदन करण्यात येत आले.
त्याचवेळी नातेवाईक महिलांनी अचानक गांधी चौकात येऊन तीव्र संताप व्यक्त केला. रास्ता रोखून धरला. पोलिसांचे त्यांना बाजूला करता करता नाकीनऊ आले. नातेवाईक महिला मात्र आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही, आमचं लेकरू गेलं आहे. त्यास दोषी असणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे, असाच संताप व्यक्त करीत होत्या. बराच वेळ रास्ता रोको करत असल्याने चौकामध्ये वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.
रविवार सकाळी ही घटना घडली असे सांगण्यात येत असताना सोमवारी सायंकाळ पर्यंत तरी लातूरच्या एमआयडीसी पोलिसात या प्रकरणात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती उपलब्ध होत आहे. लातूर येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात वारंवार विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांचा छळ व आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. यावर नियंत्रण का ठेवले जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.​

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR