लातूर : प्रतिनिधी
कृषि विद्यापीठ हे नेहमीच शेतकरी व विद्यार्थी हित समोर ठेवून कार्य करत आहे. सद्यस्थितीत शेतकरी नैसर्गिक आपत्तींशी लढत आहे. अशावेळी कृषीचे विद्यार्थी व समाजाने शेतक-यांप्रती संवेदनशील बनून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. विद्यार्थी जीवनात सर्वांनी कठोर मेहनत, शिस्त या गुणांचा अवलंब केल्यास यश हमखास मिळते. वैयक्तिक जीवनात यशस्वी होताना सामाजिक बांधीलकी जपून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपण देशाला येणा-या काळाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकू, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.
कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदवीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन दीक्षारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, जयश्री मिश्रा, डॉ.अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. महेंद्र दुधारे, बच्चेसाहेब देशमुख, शरद जरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. आसेवार म्हणाले, नवीन शैक्षणीक धोरणास अनुसरुन विद्यार्थ्यांनी अभ्यासपध्दतीत झालेले बदल समजून घेतले पाहिजेत. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे आयसीएआरद्वारे केलेल्या परीक्षणात विद्यापीठास अ गुणांकन मिळाले आहे. उपलब्ध सोयी-सुविधांचा वापर करुन विद्यार्थ्यांनी स्वत:चे प्रात्यक्षिक ज्ञान परिपूर्ण करावे व बदलत्या वातावरणामुळे कृषि क्षेत्रात रोज नव्याने निर्माण होणा-या समस्यांवर उपाय शोधून शेतकरीहित जोपासावे.
यावेळी डॉ. ठोंबरे यांनी प्रास्ताविकात नवप्रवेशीत विद्यार्थी व उपस्थित पालकांशी संवाद साधत कृषि महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील असून पालकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महाविद्यालयाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील व्याख्यानगृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, वसतीगृहे व संपूर्ण महाविद्यालय परिसरात असलेले सौहार्दपूर्ण वातावरण टिकविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.
यावेळी नवप्रवेशीत विद्यार्थी, पालक व शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केली. दुपारच्या सत्रामध्ये महाविद्यालयातील विविध विभाग उदा. शिक्षण, जिमखाना, परीक्षा व शिष्यवृत्ती, वसतीगृह, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण व समुपदेशन यांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना संबंधित विभागाद्वारे पार पाडली जाणारी कामे, उपक्रम यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. दयानंद मोरे व डॉ. रमेश ढवळे तर आभार डॉ. अच्युत भरोसे यांनी मानले.

