लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा देखील सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करणे गरजेचे आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करून आत्तापासूनच भविष्यातील यशाचा पाया रचला पाहिजे. परंतु, मोबाईलच्या अतिवापरामुळे आजच्या विद्यार्थ्यांचे करिअर कडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गरजेनुसारच मोबाईलचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनो मोबाईल चे कस्टमर पेक्षा युजर बना आणि योग्य दिशेने वाटचाल करत आपली स्वप्ने पूर्ण करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.
दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रज्ञान शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या करिअर कट्टा या विद्यार्थी संवाद उपक्रम प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने, डॉ. हरिदास फेरे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. मनिषा अष्टेकर, डॉ. साईनाथ उमाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. मान्नीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांनी आपणांस ज्या विषयात आपले करियर करायचे आहे त्यातच आपला अमूल्य वेळ द्यावा. समन्वयक प्रा.अजय चव्हाण, प्रा. क्षितिज कांबळे, प्रा. सिद्दिका पटेल, प्रशासकीय कर्मचारी व करिअर संसदेतील मुख्यमंत्री अजिंक्य जाधव आणि सर्व संसद पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात करिअर कट्टा अंतर्गत विविध पदांवर निवडलेले सर्व पदाधिकारी मंत्री मंडळास मान्यवरांच्या हस्ते करिअर संसद पदाधिकारी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. साईनाथ उमाटे यांनी केले. सूत्रसंचालन निकिता बिराजदार तर आभार माधवी टेकाळे यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल डॉ. विठ्ठल जाधव, प्रा.अक्षय पवार, प्रा. डी. व्ही. शर्मा यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

