किल्लारी : वार्ताहर
औसा तालुक्यातील किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या विद्युत तारा चोरीप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाचे दोन आरोपींना अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असते एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. घटनास्थळी लातूर गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली आहे. किल्लारी येथील विविध डीपीवरील लघुदाब वाहिनीच्या जुन्या वापरातील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. ईदगाह डीपी, टाचले डीपी आणि ओल्ड किल्लारी गावकरी डीपी परिसरातून एकूण सुमारे ३ हजार ५०० मीटर विद्युत तारा, ज्याची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये आहे. चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर किल्लारी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, भंगार विक्रेत्यांकडे चौकशी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आकाश गोपाळ देंडे (वय ३१, रा. किल्लारीवाडी, ता. औसा) आणि अविनाश आजप्पा कोमारे (वय २५, रा. शिवनगर, निलंगा) यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी अटक करण्यात आली. अटकेपूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अटकेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपींनी अशाच प्रकारच्या अन्य चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे सांगितले असून, आणखी एक साथीदार मोहन धोंडीराम पांचाळ (रा. अंबुलगा पोळ, ता. निलंगा, ह. मु. किल्लारी) याचे नाव समोर आले आहे. पोलिस अभिलेख तपासला असता किल्लारी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या काही चोरीच्या गुन्ह्यांशी त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चोरीस गेलेला माल, गुन्ह्यात वापरलेली वाहने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली साधने जप्त करणे, आरोपींचे इतर साथीदार शोधणे आणि अन्य गुन्ह्यांचा तपास करणे बाकी असल्याने पोलिस उपनिरीक्षक किसन म. मरडे यांनी आरोपींना न्यालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. या कार्यवाहीत पोलिस उपनिरिक्षक गोपाळ शिंदे, सहायक फौजदार गणेश यादव, पोलिस अंमलदार महेश पवार, रवि करके, कालिदास फुगटे, कृष्णा गायकवाड, नितीन चव्हाण, शिरसमकर, आकाश सरतापे यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा अधिक तपास किल्लारी पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय विद्युत कायदा कलम १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ज्ञ अमोल बालाजी शेळके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
















