मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीवरून खलबतं सुरू असून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही. अद्याप महायुतीकडून जागावाटप जाहीर झाले नसून पक्षश्रेष्ठींच्या वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. नुकतेच शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
यावेळीदेखील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून चर्चा झाल्याचे समजते. तसेच भाजपने दिलेला महायुतीचा १२-४-१ चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य असल्याचेही सांगितले जात आहे. विधान परिषदेवर शिवसेनेच्या वाट्याला आत्तापर्यंत ४ जागा आहेत.
ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपसोबत आल्यानंतर शिवसेनेला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा तसेच सत्तेत सगळ्यात कमी वाटा दिला जात असल्याची खंत एकनाथ शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
शिवसेना –
ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी,
राष्ट्रवादी काँग्रेस –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
भाजप-
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशिव-बीड, सोलापूर, अहिल्यानगर
दरम्यान, शिवसेनेला पाच जागा मिळाव्यात आणि सहावी जागा छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही मेरिटच्या आधारे जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे. त्यानुसार जागावाटप झाल्यास पुढील संभाव्य नावे समोर येत आहेत.
ठाणे – पालघर : रवींद्र फाटक नाव जवळपास निश्चित
हिंगोली – परभणी : अभिमन्यू खोतकर किंवा बिप्लव बजोरीया
छत्रपती संभाजीनगर : राजेंद्र जंजाळ किंवा बाजीराव चव्हाण
नाशिक : हेमंत गोडसे, सईद खान, भाऊसाहेब चौधरी
रायगड : विकास गोगावले (भरत गोगावले यांचे सुपुत्र)
जळगाव : प्रतापराव पाटील (गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र)
















