22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeसोलापूरविमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, दुर्घटना टळली

विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, दुर्घटना टळली

पायलटच्या सतर्कतेमुळे ३४ प्रवाशांचे प्राण वाचले

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानाचे लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणा-या विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणा-या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलीच समज दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलं विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले. विमानतळ परिसरात मोकळ्या आभाळात ते पतंग उडवू लागले. दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून सोलापूरला जाणारे एक विमान दाखल झाले. यामध्ये एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर विमानतळाच्या रनवेवर हे विमान लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला.

ही बाब पायलटच्या लक्षात येताच पायलट सतर्क झाले. त्यांनी सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केले. त्यामुळे ३४ प्रवाशांवरचे मोठे संकट दूर झाले. याप्रकरणी शोध घेतला असता विमानतळ परिसरात काही अल्पवयीन मुलं पतंग उडवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या मुलांचा शोध घेत मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगली समज दिली.

शिवाय विमानतळ परिसरात गैर पद्धतीने नायलॉन मांजा विकणा-या बिलाल इब्राहिम शेख या दुकानदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान नायलॉन मांजा विकण्यावर बंदी असतानाही अद्यापही त्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR