नाशिक : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी विमान अपघाताविषयी शंका उपस्थित करत, ‘विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे,’ असे मोठे विधान करत शंका उपस्थित केली आहे. नाशिक येथे शोकसभेत भुजबळांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे विमान अपघाताविषयी शंकांचे गारूड वाढताना दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते अजूनही या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकलेले नाहीत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे.
देशात अनेक विमान अपघात झाले. परंतु महाराष्ट्रात अशाप्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदा झाला. मी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हे विमान इथे आले कसे काय? हे कळेना. टेबल टॉप होता आणि खाली ५०-६० फूट खाली पडले होते, असे छगन भुजबळांनी सांगितले.
त्यानंतर जेव्हा मी पार्थला भेटलो त्याच्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज होते. त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुस-यावेळी सरळ असणारे विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते होते, असे देखील भुजबळांनी सांगितले.
तसेच या घटनेबाबत सांगताना भुजबळ म्हणाले, चौकशी होईल, मी त्यातला तज्ज्ञ नाही परंतु मी अनेकांशी बोलतोय. त्यात कुठेतरी काही गडबड झाली आहे, इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये. आणखी काही असू शकते. चौकशी होईल, त्याची माहितीही येईल. पण जी सोन्यासारखी माणसे गेली ती कशी काय परत येतील असे म्हणत छगन भुजबळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

