मुंबई : प्रतिनिधी
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने आपले राज्यव्यापी मशाल मोर्चा आंदोलन स्थगित केले आहे. आता १५ जून नंतर या आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतचोरी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे या कथित मतचोरीचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी मशाल मोर्चा आंदोलन पुकारण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोली येथे आंदोलनात सहभागी होणार होते.
मात्र अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने श्रदधांजली वाहिली असून पुढचे तीन दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मशाल मोर्चा तुर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटयांनीही मृतांना श्रद्धांजली वाहावी व १५ जून नंतर जिल्हयातील मशाल मोर्चांची तारीख निश्चित करून प्रदेश पातळीवर कळवावी असे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी कळविले आहे.