सातारा : प्रतिनिधी
सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे. सत्ताधा-यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही. येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. त्यामुळे भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही याची भीती असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, हद्द सोडायची नाही ही साता-याच्या राजकारणाची अनेक वर्षांपासूनची पद्धत आहे. मी मात्र पक्षवाढीसाठी ही चौकट ओलांडून त्याची राजकीय किंमत सुद्धा मोजली . नगरपालिकेची ही लढाई फक्त नगरपालिकेची नाही तर तत्त्वाची आहे. भारतीय जनता पार्टीने जातीय संघर्ष तयार करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम आम्ही करत असून लोकशाही जिवंत राहील यासाठी ही धडपड सुरू आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून यशवंतरावांच्या विचारांचा वारसा भाजपला संपवायचा आहे असा आरोप त्यांनी केला तुम्ही बदलला नाहीत तर विरोधक म्हणून तुम्ही कधी आवाज उठवू शकणार नाही असे ते म्हणाले.
भारत-महाराष्ट्र भाजपमुक्त करावा लागेल – जानकर
महादेव जानकर म्हणाले की, संविधान वाचवण्यासाठी भारत व महाराष्ट्र भाजपमुक्त करावा लागेल. त्यासाठी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे. कॅबिनेट मंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र आम्हाला समजले नाही. पण लवकरच हे प्रकरण आपले नाही हे आमच्या लक्षात आले. जातीय भांडणे लावण्याचे उद्योग भारतीय जनता पार्टीने केले आहेत, असे जानकर यांनी म्हटले आहे.

