Homeमहाराष्ट्रविरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष महिलांविरोधी

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, १७ एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा होती. एक निर्णायक क्षण ठरेल असे वाटले होते. पण दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते दोन तृतीयांश मते मिळू दिली नाही. ७० कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रृणहत्या विरोधकांनी केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला, तो एक प्रकारे भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर केलेले तांडव होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मला अतिशय दु:ख आहे की, महात्मा जोतिबा फुले यांची २०० वी जन्मशताब्दी सुरू असताना विरोधकांनी त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम केले. त्यात भाषणापुरते महात्मा फुलेंचे नाव घेणारे हे पक्ष पूर्णत: उघडे पडले. सभागृहात ३ विधेयके मांडण्यात आली होती. १३४ वे घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक व केंद्रशासित प्रदेश विधेयक यांचा त्यात समावेश होता. आपल्याला कल्पना असेल की, १९७६ मध्ये देशात डीलिमिटेशन झाले, तेव्हा घटनादुरुस्ती करून आपण निर्णय घेतला की, १९७१ ची लोकसंख्या फ्रिज ठेवून २००० सालापर्यंत डीलिमिटेशन होणार नाही. यासंदर्भात २००२ साली डीलिमिटेशन कमिशन अस्तित्वात आले, तेव्हा महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याला पुन्हा २० वर्षांची वाढ दिली. २०२३ साली महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती झाली, त्यावेळी जनगणना व डीलिमिटेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण करून हे विधेयक लागू करण्यात येईल अशी घटनादुरुस्ती झाली. याचा अर्थ परवा जी विधेयके आली, ती काही अचानक आली नाही.

१ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार
महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या होत असेल, तर त्याविरोधात लोकशाहीत जनमताचा रेटा तयार केला जाईल. आपण महिलांचा सामना करू शकणार नाही असे ज्या दिवशी वाटेल, त्या दिवशी हे राजकीय पक्ष वठणीवर येतील. महिला आरक्षण विधेयकाला मान्यता देतील. त्यासाठी महायुतीतील सर्वच घटकपक्ष जनमत तयार करण्याचे काम करतील. महिलांना संघटित करण्याचे काम करू. या बिलाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील १ कोटी महिलांच्या सह्या गोळा केल्या जातील. त्याचबरोबर तालुका पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाईल.

जनमताचा रेटा तयार करणार
भारतीय जनता पक्षाने यासंदर्भातील मेळावा बोलावला आहे. तिथे मित्रांना निमंत्रित करू. सर्व पक्ष महिलांमध्ये जनजागृती करून, महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार आणि उबाठाचा चेहरा उघडा करू. निश्चितपणे असा जनमताचा रेटा तयार होईल, की त्यांना निश्चितपणे महिला आरक्षण विधेयकाला मंजूर करून द्यावा लागेल. जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR