उद्धव ठाकरे यांनी मविआच्या बैठकीत मांडले मत
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो. पण आपण खरेच एकत्र आहोत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मविआच्या बैठकीत उपस्थित केला. यापुढे तीनही पक्षांना एकत्र राहून काम करावे लागेल. एकत्रित मुद्दे मांडावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच येणा-या काळात विधिमंडळ अधिवेशनातही आपण एकी दाखवली पाहिजे, असे म्हटले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ६० पैकी ३७ आमदार उपस्थित होते तर जयंत पाटील यांच्यासह २३ आमदार अनुपस्थित होते. शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनात पहिल्या दोन दिवसात विरोधकांना म्हणावे तितक्या ताकदीने प्रश्न उपस्थित करता आले नसल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला २३ आमदार उपस्थित राहू शकले नाहीत.
महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला. येणा-या काळात विधिमंडळ अधिवेशनातही महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून एकी दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलनही एकत्रित करायला हवे, आपली एकी राज्यभर दिसायला हवी, असे मत उद्धव ठाकरेंसह इतर नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.
















