20.5 C
Latur
Sunday, January 25, 2026
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्ष फोडण्यासाठी कुंभमेळ्याच्या बजेटचा वापर

विरोधी पक्ष फोडण्यासाठी कुंभमेळ्याच्या बजेटचा वापर

- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

पुणे : प्रतिनिधी
तपोवनातील वृक्षतोडीवरून विरोधकांच्याच नव्हे, तर अवघ्या नाशिककरांच्या रडारवर आलेले नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. गिरीश महाजन कुंभमेळ्याचे बजेट विरोधी पक्ष फोडाफोडीसाठी वापरतात असा अत्यंत गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी १० जानेवारी रोजी पुण्यामध्ये बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सडकून प्रहार केला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवारांनी अगोदर सरकारमधून राजीनामा द्यावा आणि मग भाजपवर टीका करावी. गोचिडासारखं सत्तेला चिकटून राहू नये, असा सणसणीत टोलाही लगावला. ते म्हणाले की, अजित पवारांनी भाजपमध्ये जे काही सुरू आहे ती नुरा कुस्ती आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपने भ्रष्टाचार केला आहे. अजित पवारांनी मुंढवा जमीन प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे भाजपने अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसचा कायाकल्प झालेला असेल, असा विश्वास सुद्धा सपकाळ यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, तपोवन परिसरातील झाडे छाटण्याच्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी सुद्धा काल झालेल्या विराट सभेत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, संजय राऊत म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कु-हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात.

बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत असा खोचक टोला त्यांनी लगावला. मनसेच्या सत्तेत २०१२ साली पार पडलेल्या कुंभमेळ्याची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, त्या काळात एकही झाड न तोडता जागतिक स्तरावर कौतुक होईल, असा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यात आला. मात्र, आता वृक्षतोड करून ही जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचे नियोजन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. साधू-संत घरी गेल्यानंतर ही जमीन कुणाला द्यायची, हे यांचे आधीच ठरलेले असते, असा घणाघात त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR