नवी दिल्ली/लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि. ला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार दिमाखात प्रदान करण्यात आला. कारखान्याला मिळालेला हा एकूण ४० वा पुरस्कार असून, या ऐतिहासिक यशासह सहकार क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. त्यामुळे लातूरच्या सहकार क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत विंडसर पॅलेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे आयोजित पुरस्कार सोहळ््यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, गुजरातचे सहकारमंत्री जीतूभाई वाघाणी, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पंजाबचे कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री गुरमित सिंह खुदियान, माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि.,चे उपाध्यक्ष केतनभाई सी. पटेल, गुजरातचे जलसंपदा व पाणी पुरवठा राज्यमंत्री ईश्वरसिंह टी. पटेल, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह सहकार आणि साखर क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार व कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, संचालक सर्वश्री सतीश शिंदे (पाटील), अमृत जाधव यांनी स्वीकारला.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून हा कारखाना उभा राहिला आहे. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, माजी आमदार
धिरज विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या समर्थ नेतृत्वामुळे हा कारखाना सातत्याने नवनवीन शिखरे सर करत प्रगतीपथावर आहे. मागील हंगामातही कारखान्याने सभासद शेतक-यांना एफआरपीपेक्षा अधिक प्रति मे. टन ३१७१/- उच्चांकी ऊस दर दिला आणि शेतकरी व ऊस उत्पादक हिताची परंपरा कायम राखली आहे.
कारखान्याच्या गळीत हंगामातील उत्कृष्ट कामकाज आणि तांत्रिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी कारखान्याच्या प्रगतीबद्दल भरभरून गौरवोद्गार काढले. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारासाठी हंगाम २०२५-२६ मधील कामकाजाचे अत्यंत सखोल मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत साखर उता-यात उल्लेखनीय वाढ नोंदवत कारखान्याने १२.२१ टक्के उच्चांकी उतारा मिळवला आहे. याशिवाय, विना-स्टॉपेजेस अखंडित ऊस गाळप, गाळप क्षमतेचा कार्यक्षम वापर, उच्च प्रतीचे साखर उत्पादन, इंधनाचा अत्यंत कमी वापर आणि उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे या सर्व कठीण निकषांवर विलास कारखान्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. हंगामात कारखाना एकही दिवस बंद राहणार नाही यादृष्टीने राखलेले तांत्रिक नियोजन कौतुकास्पद ठरले.
या गौरवास्पद यशाबद्दल मांजरा परिवारातील शेतकरी, सभासद, अधिकारी, कामगार आणि सर्व लातूरवासीयांकडून आनंद व्यक्त होत असून, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी या यशाचे श्रेय सर्व घटकांना देत त्यांचे अभिनंदन केले.
विक्रमी गाळप आणि उत्पादन
कारखान्याने गळीत हंगामात एकूण ६,५१,४३१.२३६ मे.टन उसाचे विक्रमी गाळप केले. यादरम्यान १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखत ७,१४,४७० क्विंटल साखर उत्पादित केली. साखर उत्पादनासोबतच ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज निर्मिती करून २ कोटी ८२ लाख युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस निर्यात केली. तसेच डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी १ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती करत कारखान्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीची चुणूक दाखवली.
२६ वर्षांत ४० पुरस्कार
कारखान्याला आजवर ‘सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था’ ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना सहकार भूषण’ ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ आणि ‘उत्कृष्ट ऊस विकास’ अशा विविध मानाच्या श्रेणींमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर ३९ पुरस्कार मिळाले होते. आता यात ४० व्या राष्ट्रीय पुरस्काराची भर पडली. कारखान्याने यशस्वी वाटचालीच्या अवघ्या २६ वर्षांत ४० प्रतिष्ठित पुरस्कार मिळवण्याचा एक नवा आणि ऐतिहासिक विक्रम रचला.















