लातूर : लातूरचे सुपुत्र तथा मागच्या १२ -१३ वर्षांपासून हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले निर्माता, दिग्दर्शक विशाल गिरी यांची नॅशनल आयकॉन अवॉर्डसाठी निवड झाली आहे. या अवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार,दि. १० जुलै रोजी प्रधानमंत्री संग्रहालय, तीन मूर्ती मार्ग, नवी दिल्ली येथे होणार आहे.
भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन विभाग, जम्मू-काश्मीर सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल गिरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील मंत्रीगण, संरक्षण मंत्रालयातील पदाधिकारी यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. लातूरसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले निर्माता, दिग्दर्शक विशाल गिरी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड्ससुद्धा मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल गिरी यांनी पर्यटन विभाग मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आहेत. विशाल गिरी यांचा ‘नाद’ हा नविन मराठी चित्रपट डिसेंबर महिन्यात सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक स्वत: विशाल गिरी आहेत. त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गिरी यांचे अभिनंदन केले आहे.