मुंबई : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. महिलांसाठीच्या या मेगा स्पर्धेसाठी बीसीसीआयने बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. हा विश्वचषक ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत बीसीसीआयने यावेळी बक्षीस रकमेत २९७ टक्के वाढ केली आहे. १ सप्टेंबरआयसीसीने केलेल्या या घोषणेमुळे आता महिला क्रिकेटलाही प्राधान्य मिळणार, अशी चर्चा रंगली आहे.
आयसीसीने महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम १३.८८ दशलक्ष डॉलर केली आहे. ती भारतीय रुपयांमध्ये १२२ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी हा निर्णय घेऊन महिला क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. महिला वर्ल्ड कप जिंकणा-या संघासाठी ४.४८ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ते भारतीय रुपयांमध्ये तब्बल ४० कोटी रुपये आहे. तर, अंतिम सामन्यांमध्ये हरणा-या संघाला २.२४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळतील.
उपांत्य फेरीमध्ये पोहोचणा-या संघाला सुमारे १० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
ग्रुप स्टेजमध्ये एक सामना जिंकणा-या संघाला ३४ हजार डॉलर्स म्हणजेच ३०.१९ लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ६२ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाला २४लाख रुपये मिळणार आहेत. एखादा संघ सामना जिंकला किंवा नाही, तरी प्रत्येक संघाला किमान २२ लाख रुपये देण्याची घोषणा आयसीसीने केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुरुष २०२३ वनडे विश्वचषकाची बक्षीस रक्कम १० दशलक्ष डॉलर्स होती, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे ८८.२९कोटी रुपये होती.
















