Homeलातूरविश्वमैदान राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे केंद्र ठरेल

विश्वमैदान राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे केंद्र ठरेल

लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचे दालन खुले करून देणारे एमआयटी शिक्षण संकुलातील ‘विश्वमैदान’ हे आगामी काळात उत्कृष्ट खेळाडू घडविणारे महत्त्वाचे क्रीडा केंद्र ठरेल, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या वतीने आयोजित ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार काळे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक महादेव कसगावडे, माजी रणजी क्रिकेटपटू विशाल गिते, आंतर राष्ट्रीय नेमबाज जागृती चंदनकेरे-बोपचंडे, आंतर राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू ज्योती पवार, तुळशीराम कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, संचालक प्रा. तेजस कराड, डॉ. वर्षा सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा पालक आणि समाजाकडून ठेवली जाते. मात्र, वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांच्या व्यस्त दिनचर्येतूनही त्यांच्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य पुढे यावे, यासाठी डॉ. कराड यांनी ‘विश्वमैदान’ सारखी आगळीवेगळी स्पर्धा सुरू केली असल्याचे सांगून आमदार काळे म्हणाले की, एकेकाळी मुले नैसर्गिकरीत्या खेळात रमलेली दिसायची; परंतु आज खेळाकडे करिअरच्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आज विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
यावेळी कसगावडे म्हणाले की, अशा दर्जेदार आणि नियोजनबद्ध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारी एमआयटी ही पहिली खासगी संस्था असल्याचे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत यासाठी शासन प्रयत्नशील असून, आजच्या काळात खेळासाठी मानसशास्त्र आणि क्रीडा फिजिओथेरपी यांचे महत्त्व वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतर राष्ट्रीय नेमबाज जागृती चंदनकेरे-बोपचंडे, आंतर राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू ज्योती पवार यांनी खेळाडूंशी संवाद साधला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. कराड म्हणाले की, ‘विश्वमैदान २०२६’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यदायी जीवनशैली साठी आणि राष्ट्र निर्मितीच्या भावनेला बळ देणारा व्यापक उपक्रम आहे. खेळामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक ताकद, शिस्त, संघ भावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाशी जोडले गेले पाहिजे. ‘विश्वमैदान’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि खेळातून करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ. आनंद पवार, डॉ. शारदा धडे, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उपप्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, प्राचार्य सायस मुंढे, प्रा. आशा फुंदे, खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वर्षा सांगळे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. स्रेहा गणमुखी, डॉ. स्रेहा चोले आणि परमेश्वर सोनवणे यांनी  केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR