लातूर : प्रतिनिधी
तिस-या महायुद्धाच्या उंबरठावर असलेल्या जगाला विश्वशांती विश्व कल्याणासाठी मैत्र भावाचा जीवन मार्ग स्वीकारायला हवा असे प्रतिपादन साहित्यिक तथा वक्ते डॉ विश्वाधार देशमुख यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या पहिल्या विचारपुष्पात भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे हे होते. विचारपिठावर उद्घाटक म्हणून सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सुनील मिटकरी, प्राचार्य डॉ. आनंद शेवाळे, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, प्रा. नितीन वाणी डॉ. रत्नाकर बेडगे आदीची उपस्थिती होती.
जग जिंकण्याकरिता युद्धाचा, कौर्याचा आणि कायद्याचा मार्ग असे अनेक मार्ग आहेत. पण करुणा, मैत्री, स्रेह, सौजन्य, सहिष्णुतेचा मार्ग अत्यंत सोपा आणि साधा असा मार्ग आहे. यातून व्यक्ती, समाज व राष्ट्राचे जीवन अधिकाधिक समृद्ध, सुखमय व आनंदी होईल. प्रत्येकाने काळजातला द्वेष संपवून मी पणा विसर्जित करावा लागेल, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले की, समाजाचे नेतृत्व शिक्षकांच्या हाती दिल्यास शुद्ध चारित्र्याची माणसे तयार होऊन समाजातला मैत्र भाव आपोआप वाढेल. आई वडील, पती-पत्नी, शिक्षक विद्यार्थी, पालक पाल्य, मित्र मैत्रीण ही नाती मानवी जीवन समृद्ध करतात. श्रीकृष्ण, तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार तत्त्वज्ञानात संत ज्ञानेश्वरांचा मैत्र भाव आपणास दिसून येतो असेही ते म्हणाले. यावेळी टाकळीकर म्हणाले की, तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावादी धर्माचा स्वीकार करून जगाला स्रेह, प्रेम, आणि करुणेचा संदेश दिला. व्यक्तीने चराचरातील सर्वांकडे मैत्र भावनेतून पाहिले पाहिजे. तरच जगाचा उद्धार होईल असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात सांगवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात समतेचा संदेश जगाला दिला. वर्ण, जात, धर्म, वंश आणि वर्ग असा भेदभाव न करता सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. देह हेच देवालय आहे, आत्मा हा परमेश्वर आहे. सदाचार म्हणजे स्वर्ग आणि अनाचार म्हणजे नरक आहे. इतक्या साध्या सोप्या भाषेत काव्य कायकवे कैलास हा श्रमाच्या उपासणेचा मार्ग बसवण्णांनी सांगितला. त्यांच्या विचार तत्त्वज्ञान जीवनकार्याचा वसा-वारसा पुढच्या पिढींना सांगितला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद शेवाळे यांनी केले, प्रमुख अतिथीचा परिचय डॉ. मनोहर चपळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके व डॉ. अश्विनी रोडे यांनी केले तर आभार प्रा. व्यंकट दुडिले यांनी मानले. या कार्यक्रमला शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

