Homeलातूरविश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप 

विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप 

लातूर : प्रतिनिधी
९ एप्रिल हा दिवस दरवर्षी पूर्ण जगात जीतो जैन संघटनेच्या वतीने ‘विश्व नवकार मंत्र दिवस’ म्हणून श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध जैन मंदिरे, जैन देहरासर तसेच जैन उपाश्रय (स्थानक) येथे नवकार मंत्राच्या सामूहिक जपाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ, लातूर यांच्या वतीने सद्गुरु जीवराज भवन येथे पवित्र आणि मंगलमय वातावरणात सकाळी ८ ते ९ या वेळेत नवकार मंत्राच्या सामूहिक जपाचे आयोजन करण्यात आले.
नवकार मंत्र हा जैन धर्मातील अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंत्र असून त्याला ‘मंत्रांचा राजा’ असे गौरवपूर्ण स्थान प्राप्त आहे. हा मंत्र कोणत्याही व्यक्तीची पूजा न करता गुणांची पूजा करणारा असल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आणि सार्वत्रिक मानला जातो. या मंत्राद्वारे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू-साध्वी या पंचपरमेष्ठींना वंदन केले जाते. जैन तत्वज्ञानानुसार अरिहंतांमध्ये १२ गुण, सिद्धांमध्ये ८ गुण, आचार्यांमध्ये ३६ गुण, उपाध्यायांमध्ये २५ गुण आणि साधू-साध्वींमध्ये २७ गुण, असे १०८ गुणांचा समावेश असल्याचे वर्णन आढळते. कार्यक्रमाच्या दरम्यान गुरुदेव प्रार्थना झाली. त्यानंतर स्वाध्यायी सुमतीलाल छाजेड यांनी मंगलपाठ करून कार्यक्रमाची सांगता केली.शेवटी श्रावक संघाचे अध्यक्ष विपिन कोचेटा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना श्रावक संघाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR