बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला.
एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याने ३ लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई व एका चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (७) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (८) अशी मृतांची नावे आहेत. आई अफरीन आणि मुलगी अश्मिरा वसीम जमदार (३) यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ््या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वजण या दोघींच्या प्रकृतीत सुधारणेची प्रार्थना करत आहेत. रविवारपासून या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. आज सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

