23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeपरभणीविहिंप, बजरंग दलाचे जोडे-मारो आंदोलन

विहिंप, बजरंग दलाचे जोडे-मारो आंदोलन

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नोंदविला निषेध

परभणी : बांगलादेशात मागील ३ वर्षांपासून हिंदुंचा अतोनात छळ होत आहे. अनेक हिंदूंची घरे उध्वस्त केली जात आहेत. हिंदुंना रस्त्यावर बेदरकारपणे जाळून मारले जात आहे. हिंदूंना राहण्यासाठी दुसरे ठिकाण नसून या हिंसाचाराच्या विरोधात परभणीतील हिंदू समाज बांधवांनी शनिवार, दि.२७ रोजी एकत्र येऊन बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध नोंदवित जोडे-मारो आंदोलन केले. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरातील उपोषण मैदानावर झालेल्या या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखा परभणीच्या बांगलादेश मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी विहिंपचे क्षेत्र मंत्री अनंत पांडे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व तेथील हिंदूंच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारत देशात विहिंप व बजरंग दलाच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत देशाने पुढाकार घेत १५० कोटी रूपयांचा खर्च केला. परंतू बांगलादेशातील विकृत वृत्तींच्या लोकांनी तेथील हिंदूंवर अत्याचार सुरू केला असून या अत्याचाराच्या निषेधार्थ आजचे जोडे-मारो आंदोलन करण्यात आल्याचे क्षेत्र मंत्री पांडी यांनी सांगितले.

यावेळी विहिंपचे जिल्हामंत्री राजकुमार भांबरे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यात येत आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेला अत्याचार भारत देश यापुढे सहन करणार नाही. बांगलादेशातील हिंदू बांधवांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आजच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे भांबरे यांनी सांगितले.

यावेळी विहिंप सहमंत्री मनोज काबरा यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात अंनत पांडे, ज्ञानोबा शिंदे, सुरेंद्र शहाणे, राजकुमार भांबरे, मनोज काबरा, सुनील रामपूरकर, अभिजित कुलकर्णी, कमलकिशोर अग्रवाल, संजय शेळके, रितेश जैन, बबलू टाक, वैभव अससोळेकर, राजेश्वर पारवेकर, ओम मुदिराज, अनील देशमुख, प्रकाश् कुलकर्णी, गोपाळ रोडे, गणेश काळबांडे, कैलास परिख, डॉ. अमर लड्डा आदीसह विहिंप, बजरंग दलाचे पदाधिकारी, स्वंयसेवक व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR