लातूर : प्रतिनिधी
रविवारी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावरून शहराला होणारा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. परंतु सायंकाळीच वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.
रविवार दि.२६ एप्रिल रोजी धनेगाव येथून पाणीपुरवठा करणा-या प्रकल्पावरील प्रकल्पाला एक्सप्रेस फीडरद्वारे होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणांनी खंडित झाला होता. युद्धपातळीवर काम करून तो सायंकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला. परंतु या बिघाडामुळे रविवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ या कालावधीत प्रकल्पावरून पाणी उचलण्याची प्रक्रिया थांबलेली होती. सायंकाळी ती पुन्हा सुरू झाली. यामुळे काही काळासाठी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले होते. सोमवारी ते पूर्ववत सुरू झाले आहे.
शहरातील नागरिकांना दर पाचव्या दिवशी नियमितपणे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असले तरी पाणी वेळेत मिळावे याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. तांत्रिक बाबींमुळे काही वेळा अडचणी निर्माण झाल्या तरी तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत केला जात असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.

