23.1 C
Latur
Wednesday, July 9, 2025
Homeमहाराष्ट्रवीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार

वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी आणि सचेत अ‍ॅपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे नवीन अ‍ॅप विकसित करण्यात येईल अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

वीज कोसळण्याची संभाव्य पूर्वसूचना देणारी सयंत्रे बसविण्याबाबत भाजपच्या संतोष दानवे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, राज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणा-या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळते आणि वादळी परिस्थिती उद्भवते. अशावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनेत बळी पडतात.

वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावी, यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही दोन अ‍ॅप्स नागरिकांना वीज पडण्याच्या आधीच ४० किलोमीटर परिघात सावध करणा-या सूचना देतात. राज्य सरकारच्या विविध विभागांतर्फे या अ‍ॅप्सचा प्रचार आणि प्रसार सातत्याने केला जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. राज्यात सन २०२२ मध्ये वीज पडून २३६ व्यक्तींचा तर २०२३ मध्ये १८१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वीज कोसळून होणा-या मृत्यूंच्या प्रकरणात आपत्ती मदतीच्या निकषांनुसार राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. २०१७ नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना चार लाखांची मदत, गंभीर जखमी व्यक्तीस अडीच लाखांची मदत, तर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना ३७ हजार ५००, मेंढी-शेळीसाठी चार रुपये अशी मदत सरकारकडून दिली जाते. ही मदत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR