भंडारा : प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यात सोलापूर, भंडारा जिल्ह्यात काल जोरदार तडाखा बसला आहे. यातच भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या दोन घटना घडल्या असून एका गुराख्याचा मृत्यू झाला आहे. तर दुस-या घटनेत घराचे नुकसान झाले आहे.
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू होता. तर मागील आठवड्यापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून काल सायंकाळपासून भंडारा व सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट व वा-यासह पावसाने हजेरी लावली असून यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
















