रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून जनरोष उसळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी पाहणी करून सत्ताधा-यांवर कडक टीका केली. साई डोंगर परिसरात सुमारे ३ हजार मेगावॅट क्षमतेचा टोरेंट जलविद्युत प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर क्षेत्राचा वापर होणार असून त्यात अंदाजे ६०० एकर वनक्षेत्र आणि ३३२ एकर खासगी जमिनींचा समावेश आहे. टोरेंट कंपनीच्या साई डोंगर-१ प्रकल्पासाठी २० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३२ हजार झाडे तोडण्याचे नियोजन आहे. या वृक्षतोडीला ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून राजकीय नेत्यांनीही निषेध नोंदवला आहे. साई डोंगर परिसरातील आदिवासी वाडीपासून पुढील जंगलात इलेक्ट्रिक कटरने झाडे तोडली जात आहेत. या बेसुमार वृक्षतोडीवर कर्जतच्या पर्यावरण बचाव समितीने हरकत घेतली आहे. सामान्य माणसाने एखादे झाड तोडले तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो; मात्र कुठलीही ठोस परवानगी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड कशी केली जाते? असा प्रश्न समितीने केला आहे. गुजरात राज्यातील टोरेंट पॉवर कंपनी साई डोंगर भागात ३ हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारणार असून त्यासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी ३७० हेक्टर जागेची गरज असून त्यापैकी २३३ हेक्टर हे वनक्षेत्र तर १४४ हेक्टर बिगर वनक्षेत्र आहे.
पेज नदीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी २ धरणांची निर्मिती केली जाणार आहे. डोंगरमाथ्यावरील धरणाची उंची २७ मीटर तर खालच्या धरणाची उंची ५९ मीटर असणार आहे. प्रकल्पासाठी भालीवाडी, आंबोट, पोतळ, पाली, साई डोंगर, धाक या गावातील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. भूसंपादन आणि पुनर्वसनाचे काम अद्याप झालेले नसले तरी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता असून ३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होऊ शकतो. वन विभागाने या प्रकल्पासाठी जमीन दिल्याचे कोणतेही पत्र उपलब्ध नाही. मग कंपनी अथवा प्रशासन मनमानी पद्धतीने झाडांची कत्तल कशी करू शकते? असा प्रश्न पर्यावरण बचाव समितीने उपस्थित केला आहे. यामुळे ही वृक्षतोड तातडीने थांबवावी अन्यथा पर्यावरण बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये ही राज्य शासनाच्या वन विभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची कायमच मूलभूत भूमिका राहिलेली आहे. जर संबंधित प्रकल्पासाठी दुस-या प्रकल्पावर काम करणे शक्य असेल तर जंगलाचा नाश होण्यापासून वाचवलेच पाहिजे आणि वृक्षतोड कशी टाळता येईल, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला.
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या जंगलांचा -हास सुरू असेल तर तो रोखण्यासाठी जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले आहे.जुनी झाडे तोडून नवी झाडे लावण्याचा दिखावा कशासाठी? सह्याद्रीतील नैसर्गिक संपत्ती, जुनी झाडे आणि वन्यजीवांचे अधिवास वाचवण्यासाठी ‘सेव्ह सह्याद्री’ ही मोहीम उभारणार आहोत. या प्रकल्पासाठी झाडांचा बळी देण्याऐवजी पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल, अशा पर्यायांचा विचार करावा. भारतातील जंगलांपैकी ५ टक्के जंगल जमीन सह्याद्रीत आहे. येथील वाहत्या नद्या, झाडे, डोंगर यामुळे पाऊस येऊन त्या पाण्यावर महाराष्ट्र जगत आहे; मात्र आता त्याच जागेवर टोरेंट प्रकल्प आणला जात आहे. शंभर-दीडशे वर्षापूर्वीची जुनी झाडे आणि पशुपक्ष्यांची घरे उद्ध्वस्त करून काय साध्य होणार आहे? असा सवाल शिंदे यांनी केला.
















