छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट रस्त्यासाठी वारसा वृक्षांसह (वडाची मोठी झाडे) अंदाजे १ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. तर गरवारे स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नावावर ७५ झाडांची कत्तल केली जाणार आहे, या वृक्षतोडीला वृक्षप्रेमींचा विरोध होत आहे.
शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी वृक्षतोड करण्याच्या मनपाच्या हालचालींना आता विरोधाची धार लागली असून, विकासाच्या नावाखाली ३०-४० वर्षे जुन्या वृक्षांचा बळी देण्यापेक्षा तुम्ही इतरत्र हे स्टेडियम करावे किंवा झाडे न तोडता विकास करावा, अन्यथा ‘चिपको आंदोलन’ करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने व्हावेत, यासाठी महापालिकेने ५६ कोटी रुपयांच्या निधीतून गरवारे स्टेडियमचा कायापालट करण्याचे निश्चित केले आहे. चार टप्प्यांत होणा-या या कामात ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे अद्ययावत पॅव्हेलियन उभारले जाणार आहे. या भव्य नियोजनासाठी परिसरातील ३० ते ४० वर्षे जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे, या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत.

