लातूर : प्रतिनिधी
शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूरचे अध्यक्ष तथा माजी राज्यसभा सदस्य शिक्षण तल्ज्ञ, थोर विचारवंत डॉ. गोपाळराव पाटील यांचे दि. २१ एप्रिल रोजी निधन झाले. येथील जिजामाता कन्या प्रशालेत दि. २३ एप्रिल रोजी त्यांच्या अस्थींचे विसर्जन वटवृक्षाचे रोपण करून करण्यात आले.
स्व. डॉ. गोपाळराव पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान होते. त्यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक राहिले आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या प्रशालेत डॉ. गोपाळराव पाटील यांच्या स्मरणार्थ वट वृक्षाचे रोपण करून त्यांच्या अस्ति व रक्षा यांचे जमिनीत विसर्जन करण्यात आले. या वटवृक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाबरोबरच डॉ. गोपाळराव पाटील यांचे स्मरण व त्यांच्या कार्याची प्रेरणा सतत मिळत राहील यासाठी असा अनोखा उपक्रम प्रशालेच्या वतीने राबविण्यात आला.
प्रशालेच्या विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष गुरव यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात वटवृक्षाचे रोपण करून डॉ. गोपाळराव पाटील यांच्या अस्थी व रक्षा यांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

