31.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रवैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का!

बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्यामागचा वसुलीदारांचा ससेमिरा कमी होण्याचे नाव घेत नाही. अगोदरच जीएसटीच्या थकबाकीसाठी वैद्यनाथ कारखान्यावर आरआरसीची कारवाई सुरू असतानाच आता युनियन बँकेनेही कारखान्याकडे तब्बल २०३ कोटींच्या थकबाकीसाठी थेट कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीची जाहिरात करण्यात आली आहे. २५ जानेवारी रोजी हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १९ कोटी रुपयांच्या थकित जीएसटी प्रकरणी या विभागानेही कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. याचे राजकीय पडसाददेखील उमटले होते. समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशीर्वाद द्या, असे म्हणत भाजपा नेत्या मुंडेंनी आर्थिक मदत नाकारली होती. त्याच काळात बँकेने कारखान्याकडे थकित कर्जासाठी कारवाईसाठी बीडच्या जिल्हाधिका-यांकडेदेखील प्रक्रिया सुरू केली होती.

बँकेने जप्तीच्या याचिका दाखल केल्या होत्या. मात्र सदरचे प्रकरण वेगळ्या न्यायिक खंडपीठासमोर सुरू झाल्याचे सांगत बीडच्या जिल्हाधिका-यांनी बँकेची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता बँकेने थेट कारखान्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगम लिमिटेडमार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जीन लोन दिले आहे. यात काँग्रेस नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. मात्र, वैद्यनाथचा या कर्जासाठी प्रस्ताव असूनही मिळालेले नाही. याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या संकटातून पंकजा मुंडे कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR