नाशिक : प्रतिनिधी
साधूग्राम येथील झाडे तोडण्यास राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना वृक्षतोडीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. राजकीय नेते आणि त्यांचे आंदोलन जोरात आहे. आता त्यात शंकराचार्य आणि साधूंनी उडी घेतली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रश्नावर सरकारला खडे बोल सुनावले आहेत. झाडे तोडून कुंभमेळा साजरा करणे हे कोणत्या तत्त्वात बसते. कोणते साधू झाडे तोडून स्नान करणे पसंत करतील? कोणत्या धर्मात हे वसते? असा प्रश्न त्यांनी केला.
वृक्षतोडीविषयी शासनाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. कुंभमेळ्याचे केवळ निमित्त आहे. राजकीय नेत्यांचा झाडे तोडण्याचा उद्देश वेगळाच असावा. कुंभमेळा झाल्यावर ही जमीन एखाद्या योजनेसाठी किंवा सरकारच्या आवडत्या व्यक्तीला बहाल करण्यात येईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
नाशिकचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनीही वृक्षतोडीविषयी नापसंती व्यक्त केली आहे. प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करणे अयोग्य आहे. ते धर्मात देखील बसत नाही. साधूंनाही ते आवडणार नाही. कुंभमेळा सुरक्षित आणि आनंदी पार पडावा यासाठी वृक्षतोडीचा निर्णय स्थगित करावा असे आवाहन त्यांनी केले.

